आष्टा बागणी मार्गावर मस्के मळ्यातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. केराप्पा धोंडीराम बागडी (वय २७) आणि अजय पप्पन बागडी (वय १९), हे दोघे नागाव रोडवरील झोपडपट्टी येथील रहिवासी होते. बुधवारी दुपारी २ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. दोघेही पोहण्यासाठी विहिरीत गेले, पण पोहताना दम लागल्याने केराप्पाने अजयला मिठी मारली, ज्यामुळे दोघेही बुडाले. विहिरीत ४० ते ५० फूट पाणी असल्याने स्थानिक युवकांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
गंभीर परिस्थितीत स्थानिकांनी आष्टा पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी तातडीने स्पेशल रेस्क्यू फोर्सला घटनास्थळी पाठवले. रेस्क्यू पथकाच्या प्रयत्नांनंतर दोघांची मिठी सोडवून मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली होती. मृतदेहांची शवविच्छेदनासाठी आष्टा ग्रामीण रुग्णालयात पाठवणी करण्यात आली. अजयच्या पश्चात आई असून, केराप्पाच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आणि आई-वडील आहेत.
आष्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे अधिक तपास करत आहेत.