आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये प्रसिद्ध श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात मंगळवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. चंदनोत्सव सुरू असताना मंदिराच्या 20 फूट लांबीच्या भिंतीचा भाग कोसळला, ज्यामुळे सात जणांचा मृत्यू झाला आणि चार जण गंभीर जखमी झाले. दरवर्षी आयोजित होणाऱ्या या धार्मिक उत्सवात हजारो भाविक सहभागी होतात.
दुर्घटनेनंतर राज्य प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले. जिल्हाधिकारी हरेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली NDRF आणि SDRFच्या पथकांनी बचावकार्य पूर्ण केले. राज्याच्या गृह आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री वंगलापुडी अनिता यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला असून, पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना ₹2 लाख आणि जखमींना ₹50,000 ची मदत जाहीर केली आहे.
या दुर्घटनेदरम्यान मंदिरात पारंपरिक चंदनोत्सवाची विधीवत पूजा सुरू होती. पहाटेपासून मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. भगवान नरसिंहाच्या चंदन पूजेनंतर प्रोटोकॉल दर्शनाची वेळ सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. मंदिराचे वंशपरंपरागत विश्वस्त पुष्पती अशोक गजपतीराजू व त्यांच्या कुटुंबीयांनी पहिल्या दर्शनाचा मान मिळवला होता. आता दुर्घटनेची चौकशी सुरू असून मंदिर प्रशासन व राज्य सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत.